खतासाठी कृषी केंद्रांवर चकरा मारण्याची कटकट संपणार; गेवराई तालुक्यात २५ सप्टेंबरपासून 'FFS' ॲपद्वारे बुकिंग सुरू

खत विक्री FFS ॲप


गेवराई, प्रतिनिधी (गणेश सम्रथ):
        तालुक्यातील बळीराजासाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी आहे. खत खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रांसमोर तासन्तास रांगेत उभे राहणे, ऐन हंगामात खतांचा तुटवडा जाणवणे किंवा व्यापाऱ्यांकडून होणारी अडवणूक आता कायमची थांबणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या वतीने आगामी २५ सप्टेंबर २०२६ पासून संपूर्ण गेवराई तालुक्यात खत विक्रीची नवीन डिजिटल व्यवस्था लागू केली जात आहे. आता शेतकऱ्यांना ‘FFS’ (Framework for Fertilizer Sale) या मोबाईल ॲपवरून घरबसल्या खताचे आगाऊ बुकिंग करता येणार आहे.बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील एकूण २३ जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ही डिजिटल प्रणाली राबवली जात आहे. गेवराई तालुक्यात या नवीन व्यवस्थेच्या अंमलबजावणीसाठी कृषी विभागाने कंबर कसली असून, यामुळे खत वितरणात मोठी पारदर्शकता येणार आहे.
        'FFS' ॲप कसे काम करणार?शेतकऱ्यांना गुगल प्ले स्टोअरवरून ‘FFS’ ॲप डाउनलोड करावे लागेल. यामध्ये आधार कार्ड किंवा ॲग्री स्टॅक आयडी (Agri Stack ID) च्या माध्यमातून नोंदणी करता येईल. ॲग्री स्टॅक आयडी लिंक असल्यास शेतकऱ्याचा ७/१२, शेतजमीन आणि पिकांची माहिती ॲपमध्ये ऑटोमॅटिक उपलब्ध होईल. आधार कार्ड वापरल्यास ही माहिती स्वतः भरावी लागेल.
घरबसल्या अशी होणार खरेदी:
१. साठा तपासणी:
ॲपवर लॉग इन केल्यानंतर आपल्या परिसरातील किंवा गावातील कोणत्या कृषी सेवा केंद्रात कोणता आणि किती खताचा साठा शिल्लक आहे, हे शेतकऱ्याला थेट मोबाईलवर दिसेल. 
२. कोटा आणि बुकिंग: 
शेतजमिनीच्या क्षेत्रफळानुसार आणि पिकाच्या गरजेनुसार खताचा कोटा निश्चित केला जाईल. त्यानुसार शेतकरी हवे ते खत बुक करू शकतील.
३. QR कोड जनरेशन: 
बुकिंग यशस्वी झाल्यावर शेतकऱ्याच्या मोबाईलवर एक QR कोड येईल. हा कोड पुढील २ ते ३ दिवस वैध राहील. शेतकरी आपल्या सवडीनुसार दुकानात जाऊन हा QR कोड दाखवून आपले खत हक्काने घेऊ शकतील.
सक्ती आणि काळ्याबाजाराला लगाम!
अनेकदा खताचा तुटवडा दाखवून दुकानदार शेतकऱ्यांना खतासोबत इतर महागडी औषधे किंवा टॉनिक घेण्याची सक्ती करतात. मात्र, नवीन 'FFS' प्रणालीमुळे व्यापाऱ्यांची ही मनमानी पूर्णपणे थांबणार आहे. शेतकऱ्याने ॲपवर बुकिंग केल्यामुळे दुकानदाराला केवळ छापील किमतीत (MRP) खत देणे बंधनकारक राहील. तसेच खतांचा काळाबाजार आणि बोगसगिरीला पूर्णपणे आळा बसेल.
कृषी विभागाचे आवाहन:
"गेवराई तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी या आधुनिक सुविधेचा लाभ घ्यावा. २५ सप्टेंबरपासून ही व्यवस्था सुरू होत असून, कोणत्याही शेतकऱ्याला खतासाठी आता दुकानांवर चकरा मारण्याची गरज पडणार नाही. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचेल."
— तालुका कृषी अधिकारी, गेवराई.

Comments

Popular posts from this blog

प्रभुरामचंद्र विद्यालय दादेगाव येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा विद्यार्थ्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणांनी जिंकली उपस्थितांची मने

राज्यातील पिके करपण्याच्या मार्गावर; १९ सप्टेंबरपासून मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू, पाऊस दिलासा देणार का?