रेशीम उत्पादनात गेवराई तालुका जिल्ह्यात नंबर वन! 'रुई' गावासह अनेक गावांनी पारंपरिक शेती नाकारत घडवली क्रांती
गेवराई, प्रतिनिधी (गणेश सम्रथ): निसर्गाचा लहरीपणा आणि पारंपरिक पिकांमधील वाढत्या खर्चामुळे शेतकरी त्रस्त असताना, गेवराई तालुक्यातील शेतकऱ्यांनी रेशीम उद्योगाच्या माध्यमातून जिल्ह्यात नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. सध्या तब्बल १,४४७ एकर क्षेत्रासह गेवराई तालुका बीड जिल्ह्यात रेशीम उत्पादनात पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. तालुक्यातील रुई हे गाव जिल्ह्यात सर्वाधिक रेशीम उद्योग करणारे गाव ठरले आहे. या गावासोबतच आता राहेरी, नागापूर, कामखेडा, बऱ्हाणपूर, राजेवाडी आणि पुरुषोत्तमपुरी ही गावे देखील १०० एकर क्षेत्राकडे वाटचाल करत आहेत. कमी पाण्यात आणि वर्षभरात तब्बल चार वेळेस हमखास उत्पादन देणाऱ्या या शेतीमुळे गेवराईतील ऊसतोड कामगार आणि तरुण शेतकरी आता दरमहा लाखोंची कमाई करत स्वतःचे जीवनमान बदलत आहेत