दादेगाव येथे विविध क्षेत्रांत यश संपादन केलेल्या भूमिपुत्रांचा ‘विशेष गुणगौरव सोहळा-२०२६’ उत्साहात संपन्न!
विशेष प्रतिनिधी: शुक्रवार, दिनांक २ ऑक्टोबर दादेगाव (ता. आष्टी, जि. बीड) येथील श्रीराम मंदिर सभागृहात दादेगाव ग्रामस्थ, कृतीशील सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी संघटना शाखा आष्टी आणि क्रांतीज्योती सेवाभावी संस्था दादेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दादेगाव परिसरातील गुणवंतांचा व विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या भूमिपुत्रांचा ‘विशेष गुणगौरव सोहळा-२०२६’ अत्यंत उत्साहात आणि दिमाखात पार पडला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रसिद्ध माजी प्राध्यापक श्री. मुकुंद काका धनेश्वर यांनी भूषविले. या सोहळ्यात विविध राष्ट्रीय, राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त व्यक्ती, गुणवंत विद्यार्थी, खेळाडू, नवनियुक्त शिक्षक, तसेच प्रामाणिकपणे मौल्यवान वस्तू परत करणाऱ्या नागरिकांचा सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
महत्त्वाचे सत्कारमूर्ती व पुरस्कार वितरीत झालेले क्षेत्र:
राष्ट्रीय / राज्यस्तरीय पुरस्कार: प्राचार्य हरिदास विधाते यांना 'आनंदी युनिव्हर्स फाउंडेशनचा राष्ट्रीय गौरव पुरस्कार २०२६' तर प्राचार्य शिवदास विधाते यांना 'शिवस्वराज्य राज्यस्तरीय प्रशासन अधिकारी पुरस्कार २०२६' प्रदान करण्यात आला. तसेच श्री. दिलीप मुरलीधर पालवे यांना 'ज्ञानज्योती बहुद्देशीय संस्था टाकळी भान आदर्श शिक्षक पुरस्कार-२०२६' ने सन्मानित करण्यात आले. डॉ. संतोष शंकरराव विधाते यांची जिल्हा क्षयरोग अधिकारी, अहिल्यानगर येथे नवनियुक्त झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
विद्यार्थी गुणगौरव: स्वातंत्र्य सेनानी कै. बुधाजी गायकवाड पुरस्कार (जि. प. माध्यमिक शाळा ८०%+) व कै. नेहरू दशरथ विधाते स्मरणार्थ (इ. १० वी ८०%+ प्रभू रामचंद्र विद्यालय) अंतर्गत अनेक गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. तसेच जिल्हा परिषद शाळा कोल्हेवाडी व प्रभुरामचंद्र विद्यालयाच्या शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचाही सत्कार झाला.
क्रीडा क्षेत्र: कुस्ती स्पर्धेत हिंगोली विभागीय स्पर्धेकमी निवड झालेले व पदकविजेते कुस्तीपटू (अनुष्का विधाते, कल्याणी विधाते, पंकजा कोकरे, काजल काळे, विद्या वाघुले, आदेश महारनोर) आणि पैलवान दत्ता वाघुले उत्कृष्ट खेळाडू पुरस्काराने गौरविण्यात आले.
नवनियुक्त शिक्षक व प्रामाणिकपणा:
श्री. वशिष्ठ ठोंबरे सर, दत्ता महानेर, वर्षा बांदल, सतीश शिंदे, कोमल तांबे, सिद्दीका नागरगोजे यांच्यासह अलोकराज म्हस्के याने सापडलेली अंगठी अत्यंत प्रामाणिकपणे परत केल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. याशिवाय दीर्घ सेवा व बदली झालेल्या शिक्षकांचाही यथोचित सत्कार करण्यात आला.
मान्यवरांची उपस्थिती व संचालन:
या दिमाखदार सोहळ्याला दादेगावचे आजी-माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, तसेच परिसरातील प्राध्यापक, शिक्षक, पोलीस पाटील, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक आणि विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित मान्यवर व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे अतिशय नेटके सूत्रसंचालन कृतीशील सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी संघटना शाखा आष्टीचे अध्यक्ष श्री. शिवाजीराव कोल्हे सर यांनी केले, तर आभार क्रांतीज्योती सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष श्री. निलेश विधाते यांनी मानले. सोहळ्याच्या यशस्वितेसाठी समस्त ग्रामस्थ व मानकरी मंडळींनी विशेष परिश्रम घेतले.


Comments
Post a Comment