स्व. केशरकाकू क्षीरसागर यांच्या २० व्या पुण्यस्मरणानिमित्त विनम्र अभिवादन: बीडच्या रेल्वे क्रांतीच्या 'अमूर्त' शिल्पकार!
विशेष लेख: कचरू चांभारे, बीड (९४२१३८४४३४)
काकू, तुमच्या देहाने चिरविश्रांत विसावा घेतला त्या गोष्टीला कालमापनात आज विसावं वर्ष आहे, पण बीडच्या राजकीय पटलावर तुम्ही अजूनही हयात आहात. बारा दिवसांपूर्वीच तर आपली भेट झाली होती. तारांगण गर्दीत मी तुम्हाला दिसलो नसेलच, कारण नभोमंडळाच्या दृष्टीने मी एक अतिशय छोटा जीव; पण तुम्ही मात्र मला दिसलात.
तुम्ही दिसलात ती तारीख होती २३ सप्टेंबर. बीडसाठी पुण्याहून पहिली रेल्वे २२ तारखेला मध्यरात्री धावली. या देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू म्हणाले होते, "आम्ही नियतीशी नव्या पहाटेचा, प्रगतीच्या सूर्याचा करार केला आहे. जग झोपेत आहे, पण भारतासाठी सकाळचा सूर्य नवी पहाट घेऊन येत आहे."
माझे मित्र युवराज खरमाटे सर पहिल्या ट्रेनमध्ये पुणे ते बीड प्रवास करत होते. आम्ही सारखं अपडेट घेत होतो. मध्यरात्रीच्या सुमारास पुण्याहून ट्रेन निघताना मला पंडित नेहरूंचे ते ऐतिहासिक भाषण आठवले. फक्त आज विषय देश स्वातंत्र्याचा नव्हता, तर बीडकरांच्या स्वप्नातील रेल्वेचा होता. नेहरूंच्या जागी तुम्ही होतात व नियतीला सांगत होतात की, बीडकरांसाठी नवी पहाट आली आहे.
बीडचे पहिले खासदार स्व. रखमाजी गावडे यांच्यापासून ते विद्यमान खासदार बजरंगबप्पा सोनवणे यांच्यापर्यंत, आजवरच्या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी, पत्रकारांनी आणि संपादकांनी रेल्वेसाठी सातत्याने प्रयत्न केले. पण तुम्ही व स्व. गोपीनाथराव मुंडे साहेबांनी श्वास आणि ध्यास म्हणून या रेल्वेकडे पाहिले. आमच्या पिढीने मागील दहा वर्षांत खडीकरण, रूळ अंथरणे, स्टेशनचे बांधकाम हे सर्व डोळ्यांनी पाहिले आहे. जसं जसं बांधकाम वाढत गेलं, तसतशी रेल्वे दृष्टीपथात आल्याचे दिसू लागले.
पण काकू, तुम्ही त्या काळात स्वप्न दाखवले, ज्या काळात परळी ते अहिल्यानगर म्हणजे केवळ एक बालाघाटाची डोंगररांग होती. ना रूळ, ना खडी, ना माती... असं काहीच नसतानाही तुमच्या डोळ्यात परळी ते अहिल्यानगर रेल्वेची लांबलचक पटरी होती. बालाघाटाच्या डोंगरमाथ्यावर रेल्वेचा हॉर्न घुमेल, हा विश्वास तुम्ही पेरला आणि पुढच्या प्रतिनिधींनी हे स्वप्न विरजू न देता सतत जिवंत ठेवले. स्वप्नाचे स्थलांतर होत होत पिढ्या बदलल्या आणि अखेर ते स्वप्न साकार झाले. पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी, राजीव गांधी, पी. व्ही. नरसिंहराव यांच्याशी तुम्ही कायम बीड रेल्वेवर बोलत राहिलात. सर्व रेल्वेमंत्र्यांशी सातत्याने पाठपुरावा केलात.
२३ तारीखला ऐन सूर्योदयाच्या वेळी रेल्वे बीड स्थानकावर आली, तेव्हा उतरणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला सुखद आश्चर्याचा धक्काच बसला. काकू, 'नाना प्रतिष्ठान'चे कार्यकर्ते प्रत्येक प्रवाशाचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करत होते, सर्वांना चहा देत होते. मी पण चहा घेतला अन् नेमकं तुम्ही तिथेच मला दिसलात!
काकू, मी चौथीत असताना तुम्ही आमच्या जातेगावला आला होतात, तेव्हा तुम्हाला पहिल्यांदा पाहिलं होतं; त्यानंतर थेट आजच. शाळेतल्या मुला-मुलींसोबत बोलायची तुम्हाला फार हौस होती. चहाचा कप हातात घेऊन कृतज्ञतापूर्वक तुम्हाला पाहत मी चहा घेतला. मनात आलं, काकू तुम्ही आज हयात असता, तर हा चहा तुम्ही स्वतः आम्हांला दिला असता. आमदार-खासदार असतानाही तुम्ही स्वतः स्वयंपाक करून कार्यकर्त्यांना खाऊ घालत असत, कारण तुम्हाला स्वयंपाकाची आणि पाहुण्यांना जेऊ घालण्याची भारी हौस होती. जिव्हाळा जपण्याचे काम तुम्ही आयुष्यभर केले.
माहेर विजयपूर येथून तुम्ही नवगण राजुरीसारख्या छोट्या गावात आलात. नवगण राजुरीच्या सरपंच, बीड पंचायत समिती सभापती, आमदार आणि तीनदा खासदार होण्याचा तुमचा हा आलेख थक्क करणारा आहे. नवगण राजुरी आणि बीडला तुम्ही देशपातळीवर नेलं, अन् आता तुमच्या पाठीवर ही दोन्ही गावे रेल्वेच्या नकाशावर दिमाखात आली आहेत.
आम्ही बालपणी वाचलेल्या 'इंजिनदादा' कवितेतला इंजिनदादा आता बीड-राजुरीहून जाताना हॉर्न वाजवून तुम्हाला अखंड सलामी देत राहील!
स्व. केशरकाकूंना भावपूर्ण आणि विनम्र अभिवादन...!
Comments
Post a Comment