शिरसमार्गातील नागरी समस्यांवर किशोर मगर यांचे आमरण उपोषण; ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या

पिण्याचे पाणी, बंद फिल्टर, दुरवस्था झालेले रस्ते अन् स्वच्छतेच्या प्रश्नांवर प्रशासनाचे वेधले लक्ष


गेवराई / प्रतिनिधी:

गेवराई तालुक्यातील प्रमुख बाजारपेठेचे गाव असलेल्या शिरसमार्ग येथील तीव्र पाणीटंचाई, बंद पडलेले पाणी फिल्टर, रस्त्यांची चाळण, पथदिवे अन् आरोग्याचा गंभीर बनलेला प्रश्न मार्गी लावण्यासाठी किशोर गुलाब मगर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या मूलभूत समस्यांवर तातडीने उपाययोजना कराव्यात, या मागणीसाठी त्यांनी सोमवार, दि. १२ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० वाजेपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.

शिरसमार्ग हे परिसरातील मोठे आणि महत्त्वाचे व्यापारी केंद्र असूनही येथील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. ग्रामपंचायतीने लाखो रुपये खर्चून बसवलेले पिण्याच्या पाण्याचे फिल्टर दीर्घकाळापासून बंद अवस्थेत आहे. ते तात्काळ दुरुस्त करून नागरिकांना स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी प्रमुख मागणी मगर यांनी केली आहे.

निवेदनातील प्रमुख मागण्या व समस्या:

रस्ते व पथदिवे: दलित वस्तीतील सिमेंट रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करावीत. भिमनगर, भोईगल्ली, कोळेकर गल्ली आणि सकाळ नगर परिसरातील बंद पडलेले पथदिवे त्वरित सुरू करावेत.

रस्त्यांची दुरुस्ती: शहाजनपूर रोड ते सकाळ नगर आणि शिरसफाटा रोडपर्यंतच्या रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली असून, या रस्त्यांची दुरुस्ती किंवा नवीन बांधकाम करण्यात यावे.

स्वच्छता व आरोग्य: गावात सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी योग्य गटारी व नाल्यांची व्यवस्था नाही. त्यामुळे ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले असून डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. डेंग्यूसारख्या साथीच्या आजारांचा धोका टाळण्यासाठी गावात नियमित स्वच्छता व जंतुनाशक फवारणी करावी.

सार्वजनिक सुविधा: सकाळ नगर चौकातील बंद पथदिवे सुरू करावेत, परिसरातील सार्वजनिक स्वच्छतागृह नागरिकांसाठी खुले करावे आणि पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी सोय करावी.

दरम्यान, यापूर्वी २२ ऑगस्ट २०२६ रोजीच ग्रामपंचायत प्रशासनाला निवेदन देऊन या सर्व समस्यांकडे गांभीर्याने लक्ष वेधण्यात आले होते. मात्र, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे अखेर ग्रामस्थांच्या हक्कासाठी आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला असल्याचे किशोर मगर यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

तुमचे शिक्षक व पदवीधर मतदार संघ मतदार यादी 2026 मधील नाव शोधा.

विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत असे करा मतदान!

शिक्षक गुणवत्तेसाठी राज्य शासनाचा मोठा निर्णय: शिक्षकांसाठी दरवर्षी ५० तासांचे CPD प्रशिक्षण अनिवार्य