भक्तांच्या नवसाला पावणारी: सिरसमार्गची श्रीक्षेत्र सुभान संतुआई देवी










गेवराई (बीड):

निसर्गाच्या रम्य सान्निध्यात आणि सिंदफना नदीच्या खोऱ्यात वसलेले गेवराई तालुक्यातील सिरसमार्ग हे गाव म्हणजे जणू एक पवित्र तपोभूमीच आहे. बीडपासून १८ किलोमीटर तर गेवराईपासून २८ किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावात भक्तांच्या नवसाला पावणारी साक्षात 'श्रीक्षेत्र सुभान संतुआई' विराजमान आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक येथे देवीच्या दर्शनासाठी आणि मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी मोठ्या संख्येने येतात.

सन २०१२-२०१३ पासून ग्रामस्थांच्या आणि भाविकांच्या अखंड लोकवर्गणी व लोकसहभागातून या भव्य मंदिराच्या जिर्णोद्धाराचे महान कार्य आकार घेऊन पूर्णतःवाकडे जात आहे. मंदिराच्या एका गाभाऱ्यात चिमाई देवी आणि दुसऱ्या गाभाऱ्यात सुभान संतुआई देवी च्या अत्यंत विलोभनीय, पुरातन पाषाणणा च्या मर्ती भाविक भक्तांना वात्सल्याची प्रचिती देतात. ५१ फूट रुंद आणि १२७ फूट लांब अशा भव्य दिव्य आर.सी.सी. सभामंडप बांधकामासह या दोन्ही मंदिराचे गगनचुंबी शिखर आणि प्रांगणातील उंच दगडी दीपमाळ पाहणाऱ्याचे डोळे दीपवून टाकते.

सहा हेक्टर जमिनीवर पसरलेला हा देवस्थानचा परिसर जणू एखादे नंदनवनच असा भासतो. हिरव्यागार झाडीने नटलेला हा माळरान परिसर, एका बाजूने वाहणारा पाझर तलावाचा खळखळता ओढा आणि गोड्या पाण्याची एक पुरातन बारव आणि भक्तांना पाणी पिण्यासाठी खोदलेली विहीर इथल्या पावित्र्यात आणि निसर्गसौंदर्यात आणखीच भर घालताना दिसत आहे . गावकऱ्यांनी या प्राचीन बारवेच्या जिर्णोद्धाराचा सुंदर संकल्पही सोडणार आहेत .

नवरात्रीच्या नऊ दिवसांत या परिसराला एका दिव्य यात्रेचे आणि चैतन्याचे स्वरूप प्राप्त होते. घटस्थापनेपासून ते विजयादशमीपर्यंत चालणाऱ्या या उत्सवात भक्तीचा अथांग सागर उसळतो. दररोज सकाळी सहा आणि संध्याकाळी साडेसात वाजता होणारी मातेची सुमधुर आरती, दोन वेळचा महाप्रसाद आणि विड्याच्या पानांचा 'तांबोळ' नावाचा विशेष प्रसाद भक्तांचे हृदय तृप्त करतो. या देवीच्या अगाध शक्तीचा आणि महिम्याचा सर्वात मोठा चमत्कार म्हणजे, भक्तीत तल्लीन झालेले काही भाविक देवीसमोर पेटवलेल्या होमातील धगधगत्या निखाऱ्यांवरून अनवाणी चालतात, तरीही त्यांच्या पायाला अग्नीची साधी झळही लागत नाही.

नवरात्रीत कीर्तन, भारूड, प्रवचन अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन गाव समितीकडून केले जाते. विजयादशमीच्या दिवशी दसऱ्याचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो, जिथे भाविक देवीला आपट्याची पाने (सोने) वाहतात आणि एकमेकांना आलिंगन देऊन सणाच्या शुभेच्छा देतात. शासनाचा 'क' वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झालेले हे मंदिर, जिथे आता भक्त निवास आणि पार्किंगची सुविधा होत आहे, ते केवळ एक दगडी वास्तू नसून लाखों भक्तांचे श्रद्धास्थान आणि ऊर्जेचा एक अखंड स्रोत बनले आहे, 

शब्दांकन:









सोमेश्वर गचांडे
माजी सरपंच सिरसमार्ग तथा
संचालक खरेदी विक्री संघ गेवराई

Comments

Popular posts from this blog

तुमचे शिक्षक व पदवीधर मतदार संघ मतदार यादी 2026 मधील नाव शोधा.

विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत असे करा मतदान!

शिक्षक गुणवत्तेसाठी राज्य शासनाचा मोठा निर्णय: शिक्षकांसाठी दरवर्षी ५० तासांचे CPD प्रशिक्षण अनिवार्य